अहमदनगर, (ऑनलाईन प्रतिनिधी) – अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला.
अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात पाठवला जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. तिहार तुरुंग प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अरविंद केजरीवालांना सोडलं जाईल. तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश सुमारे 1 तासात निकाली काढले जातात. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली दारू धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीनं (ED) अटक केली होती. ईडीच्या कोठडीत असलेल्या केजरीवाल यांच्या वतीनं निवडणूक प्रचारात सहभाग घेण्यासाठी त्यांना जामीन मिळावा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, तपास यंत्रणेनं यापूर्वीच आप प्रमुखांना जामीन देण्यास विरोध केला होता. केजरीवाल यांना जामीन दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असं त्यात म्हटलं आहे. त्याला विशेष व्यक्तीसारखं वागवले जाऊ शकत नाही. मात्र, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं युक्तिवाद ऐकल्यानंतर केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.