उद्या होणार उपांत्य व अंतिम सामने
अहमदनगर,दि.२९ डिसेंबर(प्रतिनिधी) – ७०व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” नंदुरबार, कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर यांनी महिलांत, तर सांगली, नाशिक यांनी पुरुषांत उपांत्य पूर्व फेरी गाठली. पुणे, नाशिक, मुंबई शहर, पालघर यांनी महिलांत, तर अहमदनगर, नांदेड, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे गट विजेते ठरल्याने ते थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने वाडिया पार्क येथील मैदानावरी मॅटवर हे सामने सुरू आहेत. महिलांच्या पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथमच खेळणाऱ्या नंदूरबारने धुळ्याचे आव्हान ३०-१५ असे संपुष्टात आणले. मध्यांतराला १७-०७ अशी आघाडी घेणाऱ्या नंदूरबारने नंतर देखील तोच पवित्रा घेत १५ गुणांच्या फरकाने सामना जिंकला. हर्षदा हुंडारे, समृद्धी कोळेकर(च.), ईश्वरी कोंडाळकर, अदिती जाधव(प.) नांदुर्बरकडून, तर हृतिका होनमाणे, ऋतुजा बांदिवडेकर धुळ्याकडून उत्कृष्ट खेळल्या.
दुसऱ्या सामन्यात कोल्हापुरने अत्यंत चुरशीच्या लढतीत रत्नागिरीचा प्रतिकार ३५-२३ असा मोडून काढला. पहिल्या डावात १२-१४ अशा २ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या कोल्हापुरने दुसऱ्या डावात आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला. स्नेहा शिंदे, गायत्री डोंगळे यांच्या चतुरस्त्र चढाया त्याला उत्तम पकडी करीत स्नेहल डोंगळे हिने दिलेली पकडीची साथ यामुळे हे जमून आले. रत्नागिरीच्या सिद्धी चाळके, तसमीन बुरोंडकर यांचा पूर्वार्धातील खेळ उत्तरार्धात दुबळा ठरला. ठाण्याने नांदेडचा ७३-१७ असा धुव्वा उडवीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाण्याने सुरुवातीपासूनच झंजावाती खेळ करीत पाऊण शतका जवळ गुणसंख्या नेली. माधुरी गवंडीचा अष्टपैलू खेळ तिला प्राजक्ता पुजारी, निकिता कदम यांची मिळालेली चढाई-पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. नांदेडच्या पल्लवी साळुंकेची या सामन्यात मात्रा चालली नाही. शेवटच्या सामन्यात मुंबई उपनगरने सायली जाधव, प्रणाली नागदेवता यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रायगडला ३९-२१ असे नमविले. मध्यांतराला २६-१० अशी उपनगरकडे आघाडी होती. उत्तरार्धात राययगच्या ईशा पाटील, रष्मी पाटील यांचा खेळ बहरला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने नंदूरबारला ४४-३३ असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीला दोन्ही संघ १९-१९ असे समान गुणांवर होते. विश्रांतीनंतर सांगलीच्या सौरभ कुलकर्णी, ओंकार इंजल यांनी गतिमान चढाया करीत सामना आपल्या बाजूने झुकविला. त्यांना अक्षय निकमने भक्कम बचाव करीत उत्तम साथ दिली. नंदूरबारकडून ऋषिकेश बनकर, निखिल शिंदे, राहुल ढोबळे यांनी बऱ्यापैकी लढत दिली. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात नाशिकने पुण्याला ४३-४१ असे चकवीत क्रीडारसिकांना सुखद धक्का दिला. पहिल्या डावात २२-१५ अशी आघाडी घेणाऱ्या नाशिकला दुसऱ्या डावात विजयासाठी चांगलेच झुंजविले. शेवटी २गुणांनी नाशिकने हा सामना आपल्या खिशात टाकला. नाशिककडून आकाश शिंदे, तर पुण्याकडून विशाल ताटे उत्कृष्ट खेळले