ईशान-सूर्याला कसोटीत संधी, तर रोहित-विराट..
मुंबई, दि.१४ जानेवारी – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकांसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघांप्रमाणे न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे, तर उपकर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. पण या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांना संधी देण्यात आलेली नाही.
असे असले तरी टी20 मालिकेसाठी पृथ्वी शॉचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर विदर्भाच्या जितेश शर्मालाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, टी20 मालिकेतून जरी विराट आणि रोहित यांना संधी दिली नसली, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत या दोन्ही प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर वनडे संघाचे नेतृत्वही रोहितकडेच कायम असून उपकर्णधारपदी हार्दिक पंड्याची वर्णी लागली आहे. तसेच ऋषभ पंतच्या जागेवर केएस भरतला संधी मिळाली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल आणि अक्षर पटेल कौटुंबिक कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेला मुकणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 18 जानेवारी रोजी सुरू होणार असून त्यानंतर 27 जानेवारीपासून टी20 मालिका सुरू होईल. दरम्यान फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 4 सामन्यांची कसोटी आणि २ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीही भारतीय संघाची घोषणा झाली असून यष्टीरक्षक ईशान किशनला पहिल्यांदाच कसोटी संघात जागा मिळाली आहे.
तसेच सूर्यकुमार यादवचाही कसोटी संघात समावेश झाला आहे. त्यामुळे या दोघांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी आहे. याशिवाय केएस भरतचाही यष्टीरक्षक म्हणून पर्याय असेल. तसेच रविंद्र जडेजाचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असले तरी त्याची उपस्थितीत त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. कसोटी संघाचे नेतृत्व रोहितच करणार असून उपकर्णधारपद केएल राहुल सांभाळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराहचा जाहीर केलेल्या कोणत्याही संघात समावेश नसल्याने तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचा कयास लावला जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.