हैदराबाद, दि.१८ जानेवारी –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 49.2 षटकांत सर्वबाद 337 धावांवर आटोपला. या रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळविला असून मायकेल ब्रेसवेलचे झुंजार शतक व्यर्थ गेले. या सामन्यात न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले आहे.
एका वेळी 131 धावांवर सहा विकेट गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संघर्ष करत होता. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण येथून मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनरने डाव सांभाळला. अटीतटीच्या या सामन्यात मोहम्मद सिराजने मिचेल सँटनरला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यांनी सँटनर आणि ब्रासवेलची धोकादायक भागीदारी मोडून काढली. तत्पूर्वी सहा विकेट्स पडल्यामुळे मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी न्यूझीलंडची धुरा सांभाळली. सँटनर आणि ब्रासवेल यांनी सातव्या विकेटसाठी 102 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने 46व्या षटकात आणखी एक विकेट घेतली आहे. त्याने पाचव्या चेंडूवर हेन्री शिपलीला क्लीन बोल्ड केले. शिपलीला खातेही उघडता आले नाही. सिराजने या सामन्यात चौथे यश मिळवले. हैदराबाद येथे विजय मिळवून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.