अहमदनगर,दि.१६ जानेवारी,(प्रतिनिधी) – शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम केले जात आहे. शहरासह उपनगरात देखील क्रीडांगण निर्माण करून खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. प्रत्यक्षात क्रीडा संघटनांनी दिलेल्या योगदानातून खेळाडू पुढे येत आहे. खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. मुलांना घडविण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी ज्या खेळात मुलांना आवड आहे, त्या खेळातच पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे सीईओ गफ्फर पठाण, उद्योजक केशव नागरगोजे, तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, दिनेश भालेराव, टेक्निकल डायरेक्टर तुषार औटी, कॉर्पोरेशन चेअरमन राजा मकवाना, तायक्वांदो असोसिएशनचे सचिव घनश्याम सानप, सहसचिव दिनेश गवळी, खजिनदार नारायण कराळे, गटशिक्षण अधिकारी बाबुराव जाधव, अभिजीत ढाकणे, संतोष ढाकणे, गणेश गोरे आदींसह खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, विविध खेळ खेळले जात आहे. मात्र ज्या खेळाला शासनाची व ऑलिंपिकची मान्यता आहे, अशा खेळातच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात घनश्याम सानप यांनी या खेळ प्रकारात प्रतिस्पर्धी खेळाडूशी न झुंजता आपल्यातील कौशल्याचे सादरीकरण करावे लागते. ही स्पर्धा शारीरिक व मानसिक शक्तीचे एकत्रित मिलाप असल्याचे सांगून, पूमसे तायक्वांदोची माहिती दिली.
प्रारंभी खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून तीनशेपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रा. माणिक विधाते यांनी आलेल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजेंद्र कोतकर यांनी क्रीडा संघटना एकत्र येऊन खेळाला चालना देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी मुलींच्या स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो हा खेळ उपयुक्त आहे. या खेळाने मुलींचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहणार असल्याचे सांगितले.
या स्पर्धेसाठी उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उषा शिर्के (मुंबई), प्रशिक्षक ज्योती पठारे (मुंबई), तुजार सिनडिकर (रायगड), रोहन बांगर (पुणे), राजेश खिंगरे (मुंबई उपनगर), नेताजी पवार (सोलापूर) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंग काळे यांनी केले. आभार नारायण कराळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल काजळे, प्रशांत पालवे, अक्षय चौधरी, वैभव आव्हाड, सचिन कोतकर, ऋषिकेश कांबळे, धर्मनाथ घोरपडे, सुरज कोलते, ललीत क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.