अहमदनगर,दि.२३ जानेवारी,(प्रतिनिधी) – स्पाईन फाउंडेशन गोरगरीबांना मणक्यांचे आजार तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेसाठी मदत करते. फाउंडेशन चालविण्यासाठी आम्ही गुरू-शिष्य परंपरा चालू केली. स्पाईन सर्जन घडविताना त्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली. डॉ. पवळ दाम्पत्याने स्वतःचे सेंटर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय प्रेरणादायी असून, त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा द्यावी. दिवसेंदिवस मणके आजारांत वाढ होत आहे. नगरमध्ये तज्ज्ञ स्पाईन सर्जनची गरज आता पूर्ण झाली आहे. श्रीशा टोटल स्पाईन केअर ॲण्ड डायबेटॉलॉजी सेंटरमुळे अनेकांना आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतातील पहिले स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज (मुंबई) यांनी केले.
स्वस्तिक चौकाजवळील नगर शहरातील प्रथम मणकाविकार तज्ज्ञ व डायबेटॉलॉजिस्ट पवळ दाम्पत्याच्या श्रीशा टोटल स्पाईन केअर व डायबेटॉलॉजी सेंटरचा शुभारंभ डॉ. भोजराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जगविख्यात एन्डोस्पोपीक स्पाईन सर्जन डॉ. गिरीश दातार (मिरज), संचालक मणकेविकार तज्ज्ञ डॉ. गजेंद्र पवळ, मधुमेह व उच्च रक्तदाब तज्ज्ञ डॉ. जयश्री पवळ, खा. सुजय विखे पा., आ. सुरेश धस, आ. डॉ. किरण लहामटे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, साहेबराव दरेकर, श्रीमती ज्योतीताई मेटे, जि. प. सदस्या राणीताई लंके, नगरसेविका शीतलताई जगताप, अनिल शिंदे, धनंजय जाधव, रमेश पोकळे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर्स व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी सेंटरची पाहणी केली.
प्रास्ताविकात संचालक डॉ. गजेंद्र पवळ म्हणाले की, माझ्या जीवनात गुरूला खूप अग्रस्थान व महत्त्व आहे. माझे आई-वडिल माझ्यासाठी गुरूच असून, मला ज्या गुरूंनी शिकविले व घडवले, त्यांचा मी विशेष आदर करतो. माझे कुटुंबीय, बहिण व भाऊजी यांची सेंटर सुरू करण्यास खूप मदत झाली. सर्व प्रकारच्या मणक्यांच्या उपचारासाठी श्रीशा टोटल स्पाईन केअर व मधुमेहींसाठी डायबेटॉलॉजी सेंटर सुरू केले आहे. व्यावसायिकतेचे निकष जपण्याबरोबरच सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आरोग्य क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयश्री पवळ म्हणाल्या की, सर्वगुण संपन्न आरोग्यसेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना टीम वर्कला खूप महत्त्व आहे. टीमवर्कमुळेच आम्ही हे सेंटर सुरू करू शकलो. सेंटरद्वारे मणक्यांचे सर्व आजार व मधुमेह व आणि उच्च रक्तदाब याबाबत अद्ययावत उपचारांची ग्वाही याप्रसंगी देते, असे सांगितले. खा. डॉ. सुजय विखे पा., डॉ. गिरीश दातार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सेंटरमध्ये दुर्बिणीद्वारे बिनाटाका मणक्याची शस्त्रक्रिया, ऑपरेशननंतर लगेच चालणे, फिरणे शक्य, 24 तासांच्या आत डिस्चार्ज, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक जर्मनमेड ऑपरेशन थिएटर, शहरातील सर्वप्रथम एफपीडी सी-आर्म मशिन, फिजिओथेरपी व पॅथॉलॉजी व एक्सरे सुविधा उपलब्ध असून, मधुमेह व उच्च रक्तदान निदान व उपचार, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, थायरॉईड संबंधित समस्यांवर निदान व उपचार, आहार समुपदेश, वजन कमी करणे वाढविणे यावर मार्गदर्शन केले जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत आंबेकर यांनी केले, तर आभार डॉ. दादासाहेब तरटे यांनी मानले.