अहमदनगर,दि.२ एप्रिल,(प्रतिनिधी) – कुटुंब व समाजाने वाळीत टाकलेल्या निराधार मनोरुग्णांना मायेचे छत मानवसेवा पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मिळाले आहे. रस्त्यावरील मनोरुग्णांना नवे जीवन देणारी खरी मानवसेवा घडत असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या पुढाकाराने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव रोड येथील मानवसेवा पुनर्वसन प्रकल्पात कायदेविषयक मदत व चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन न्यायाधीश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अॅड. शिर्के, अॅड. अनिल सरोदे, अॅड. तारकसे, अॅड. जारजारी शेख, अॅड. देठे, अॅड. भुषण बर्हाटे, अॅड. विक्रम वांढेकर, अॅड. अंजली केवल, अॅड. शर्मिला गायकवाड, भारती पाठक, जिल्हा न्यायालयाचे प्रशिक्षणार्थी न्यायाधीश पी.व्ही. शिंदे, न्यायाधीश ए.के. शिंदे, एस.पी. देशपांडे, एस.ए. पठाण, आर.एस. काळे, एस.आर. लंभाटे, आर.एस इरले आदी उपस्थित होते.
अंगावर ना धड कपडे …ना धड अंथरूण, जवळ पोचताच अंगातून येणारी दुर्गंधी…हे किळसवाणं दृश्य दिसल्यानंतर कोणी त्याच्याजवळ जाण्यास धजावणार नाही. मात्र अर्धनग्न, अर्धमेल्या रस्त्यावर पडलेल्या, यातनांनी विव्हळणार्या मनोरुग्णांना दिलीप गुंजाळ आणि संस्थेचे स्वयंसेवक मायेने जवळ करुन आंघोळ घालतात. मानवसेवा पुनर्वसन केंद्रात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांसह वैद्यकीय सुविधा पुरवितात. उपचारातून बरे झालेल्या मनोरूग्णांचे कुटुंब शोधून कुटुंबात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे खरे माणुसकीचे कार्य सुरु असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात दिलीप गुंजाळ यांनी मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर 2 हजार 512 मनोरुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. या संस्थेत संपूर्ण भारतातील मनोरुग्ण दाखल करून घेतले जातात. केवळ समाजातील दानशूर लोकांच्या सहभागातून ही संस्था 2006 पासून कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मानवसेवा प्रकल्पातील निराधार पिडीत मनोरुग्ण, माता-भगिनींना साडीचोळी व बंधूंना कपडे भेट देऊन फळवाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे, सिराज शेख, सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, सुरेखा केदार, अजय दळवी, शोभा मेंगाळ, गुंफा जाधव आदी उपस्थित होते.