अहमदनगर,दि.२ एप्रिल,(ऑनलाईन प्रतिनिधी) – आयपीएल 2023 मध्ये आज पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने पराभव केला आहे.
या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सने आपला 10 वर्षांचा इतिहास कायम ठेवला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस हे दोघे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बंगळुरुच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीकरून मुंबईने आरसीबीला विजयासाठी 172 धावांच आव्हान दिल.
विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली हे दोघे मैदानात उतरले. सुरुवातीपासूनच विराट आणि प्लेसिसने चौकार षटकारांची आतिषबाजी करत धमाकेदार खेळीला सुरुवात केली. 15 व्या ओव्हरपर्यंत आरसीबीची एकही विकेट पडली नव्हती. तो पर्यंत विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी 148 धावांची भागीदारी रचली.
यादरम्यान फाफ डु प्लेसिसआणि विराटने आपले अर्धशतक ठोकले. आयपीएलच्या कारकिर्दीतील विराट कोहलीचे हे 45 वे अर्धशतक ठरले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स देऊन 171 धावा केल्या होत्या. यात मुंबई इंडियन्सकडून केवळ तिलक वर्मानेच 84 धावांची खेळी केली.
तर फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 172 धावांच दिलेलं आव्हान आरसीबी संघाने 17 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स देऊन पूर्ण केलं. यात विराट कोहलीने 49 चेंडूत 82 धावांची खेळी केली. कर्णधार फाफ डु प्लेसिसने 43 चेंडूत 73 धावा केल्या. दिनेश कार्तिक शॉट मारण्याच्या नादात शुन्यावर बाद झाला तर ग्लेन मॅक्सवेलने 3 चेंडूत 12 धावांची खेळी केली.