Homeनगर शहरशिवाजी होलेंचे मारेकरी गुन्हे शाखेकडून जेरबंद, पैशासाठी केला खून

शिवाजी होलेंचे मारेकरी गुन्हे शाखेकडून जेरबंद, पैशासाठी केला खून

अहमदनगर,दि.६ मार्च,(प्रतिनिधी) – केडगाव बाह्यवळण रस्त्यावर नेप्ती शिवारात रस्त्याच्या कडेला बसलेल्या शिवाजी होले यांचा गोळ्या घालून खून केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. खून, जबरी चोरी यासह गावठी कट्ट्याच्या बळावर रोख रक्कम चोरुन नेणा-या तिघांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या पथकाने अटक केली आहे. अजय भाऊसाहेब चव्हाण (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी), सागर वसंत जाधव (रा.वळणपिंप्री, ता.राहुरी) आणि राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (रा. खेडले परमानंद, ता. नेवासा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांच्या अटकेमुळे कोतवाली पोलिस स्टेशनला दाखल खूनासह जबरी चोरीचा एक आणि घारगाव पोलिस स्टेशनला दाखल चाकू आणि गावठी कट्ट्याच्या बळावर जबरी चोरीचे दोन असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

अहमदनगर येथील केडगाव बायपास नजीक हॉटेल के-९ समोर गोळीबार करुन खुनासह जबरी चोरीचा एक गुन्हा कोतवाली पोलिस स्टेशनला दाखल आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील साकुर येथील भगवान पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना चाकू व गावठी कट्ट्याचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर्स या दुकानातील जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अरुण नाथा शिंदे (रा. नेप्ती, ता. नगर) आणि त्यांचा मित्र शिवाजी होले असे दोघे जण हॉटेल के-९ समोर मद्यप्राशन करत होते. त्यावेळी अनोळखी तिघे इसम हातात चाकू आणि पिस्टल घेवून तेथे आले होते. त्या तिघांनी अरुण शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावून तुमच्याजवळ असलेले पैसे काढून द्या असे धमकावले होते. यावेळी भयभीत झालेले दोघे मित्र पळून जावू लागले. जीव वाचवण्यासाठी पळून जात असतांना एकाने हातातील पिस्टलने शिवाजी किसन ऊर्फ देवा होले यांच्यावर गोळीबार केला. त्यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान अरुण शिंदे यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकुण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरी चोरुन नेण्यात आला होता. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला गु.र.न. ९८६/ २०२३ भादविक ३९७, ३०२, ३४ सह आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी घारगांव शिवारात रात्रीच्या वेळी अनोळखी तीन इसमांनी पुणे ते नाशिक जाणा-या रस्त्यलगत असलेल्या लक्ष्मी टायर पंक्चर या दुकानात अनाधिकारे प्रवेश करुन चाकूचा धाक दाखवत दुकानातील इसमाजवळ असलेली व दुकाना समोरील ३४,५००/- रुपये किंमतीची मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली होती.

याशिवाय पुढे जावुन त्याच तीन जणांच्या टोळीने साकुर ते मांडवे जाणा-या रस्त्यावरील भगवान पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना चाकू आणि गावठी कट्टयाचा धाक दाखवत पंपावरील २,५०,७४७/- रुपये रोख असा एकुण २,८५,२४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी चोरुन नेला होता. या दोन्ही घटने बाबत घारगांव पोलीस स्टेशनला गु.र.नं. ९३/२०२३ भादवि ३९२, ३९४ सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या अधिपत्याखाली अहमदनगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. अहमदनगर शहर व तालुका परिसर तसेच बायपाससह इतर रस्त्यावरील हॉटेल, लॉज, ढाबे व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती संकलीत करण्यात आली.

केडगांव बायपास रोडवरील खुनाचा गुन्हा, साकुर ता. संगमनेर येथील भगवान पेट्रोलपंपावरील जबरी चोरीचा गुन्हा व घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर दुकानातील जबरी चोरीचा गुन्हा हा आरोपी अजय चव्हाण याने त्याच्या साथीदारांसह केला असुन तो त्याच्या घरी आला असून तो लवकरात लवकर प्रयत्न केल्यास ताब्यात घेता येईल अशी गोपनीय, खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजली. त्यामाहितीच्या आधारे त्यांनीआपल्या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. सापळा रचून अजय चव्हाण यास त्याच्या घरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबुल करत आपल्या दोघा साथीदारांची नावे देखील उघड केली. त्यानुसार सागर वसंत जाधव आणि राजेंद्र भाऊसाहेब शिंदे या दोघांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना पुढील तपासकामी कोतवाली पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ. सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, लक्ष्मण खोकले, मपोना भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व चापोना भरत बुधवंत आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. आरोपी अजय भाऊसाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द अहमदनगर, पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे एकुण ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सागर वसंत जाधव हा देखील सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात गंभीर दुखापत व दंगा करणे असे एकुण दोन गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!