आगम आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते – पूज्य सिध्दार्थमुनीजी म.सा.
अहील्यानगर,(प्रतिनिधी) – सावेडी जैन धर्म स्थानक मध्ये प. पु. उपप्रवर्तक श्री सिध्दार्थ मुनीजी म.सा., पूज्य डॉ. सौम्याश्रीजी म.सा., पूज्य तीर्थश्रीजी म.सा., पूज्य रिध्दिश्रभ्जी म.सा. यांच्या सान्निध्यात सन २०१४ चा चातुर्मास अत्यंत धार्मिक वातावरणात सुरु आहे. या अंतर्गत जैन धर्मातील सर्वोच्च मानाचे ३२ आगम(ग्रंथ) यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. किरण मोहनलाल राका यांच्या प्रोफेसर कॉलनी परिसरातील ‘अलायाम’ बंगला येथून निघालेली मिरवणूक सावेडी जैन स्थानकात आली. मिरवणुकीत ३२ जोडप्यांनी ३२ आगमाचे शास्त्र डोक्यावर घेतले होते. प्रारंभी श्रीमती बिजाबाई मोहनलाल राका, संजय, चंद्रकांत, किरण राका यांच्यासह संपूर्ण राका परिवाराने उपस्थित भाविकांचे स्वागत केले.
मिरवणुकीत महिला, पुरुषांच्या हातात आगम सदेश असलेले फलक होते. भगवान महावीर स्वामी, जैन धर्माच्या जयघोषात हजारो श्रावक श्राविका मिरवणुकीत सहभागी झाले होते. 32 आगम सन्मानपूर्वक जैन स्थानकात स्थापन करण्यात आले. याठिकाणी 15 दिवस भगवान महावीर स्वामी यांच्या अंतिम देशना श्रीमद् उत्तराध्यन सूत्राचा स्वाध्याय होत आहे.
पूज्य सिध्दार्थमुनीजी म.सा.यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जैन तत्वज्ञानाचा पाया 32 आगमामध्ये आहे. जो आगम शिकतो, ऐकतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आगम आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते. नगरमध्ये निघालेली ही आगम मिरवणुक खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात नवचेतना निर्माण करणारी आहे.भगवान महावीर स्वामींनी सांगितलेले विचार व शब्द आपल्यासाठी वरदान आहेत.
किरण राका म्हणाले, सावेडी उपनगरातील पवित्र आगमची सवाद्य मिरवणुक सर्वांना ऊर्जा देणारी ठरली आहे. जैन धर्मात अतिशय पवित्र असलेल्या आगमच्या मिरवणुकीचा मान मिळणे हे आमच्यासाठी मोठे भाग्यच ठरले. समाजात धार्मिकता व चांगले संस्कार रूजण्यासाठी नेहमीच योगदान देण्याचा प्रयत्न राहिल.् कार्यक्रमानंतर संदीप, संजय, कचरदास सुराणा परिवाराच्यावतीने (सुराणा कॉर्नर) सर्वांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था केली होती.