अहमदनगर,(प्रतिनिधी) – खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (छत्रपती संभाजीनगर) दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत खासदार लंके यांना समन्स पाठविण्याचा आदेश दिला. यावर पुढील सुनावणी आता २ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या खटल्याच्या कामकाजाला आता सुरवात झाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी निवडणूक प्रचार काळात आपल्याविरूद्ध बदनामीकारक आणि खोटा प्रचार करून विजय मिळविला आहे, त्यामुळे त्यांची निवड रद्द ठरवावी, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका विखे यांनी दाखल केली आहे. विखे यांच्यावतीने अॅड. व्ही. डी. होन आणि ए. व्ही होन बाजू मांडत आहेत. अशा प्रकाराच्या याचिकांमध्ये साधारणपणे निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन आणि अन्य विरोधी उमेदवारांनाही प्रतिवादी केले जाते. मात्र, विखे यांनी केवळ लंके यांना एकट्यालाच प्रतिवादी केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आयोगाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
१९९१ मध्ये बाळासाहेब विखे विरूद्ध यशवंतराव गडाख यांच्यात अशाच प्रकारचा खटला चालला होता. त्या खटल्याच्या आठवणी ताज्या झाल्या असल्याचे मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केले.