अहमदनगर,दि.८ जानेवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस अंमलदार यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना रावसाहेब कासार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज (रविवार) सकाळी कामावरुन घरी परतल्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला. काही वेळाने त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री त्यांची ड्युटी होती. नाईट ड्युटी संपवून आज सकाळी त्या बोल्हेगाव उपनगरातील त्यांच्या राहत्या घरी आल्या. घरातील खोलीत त्या गेल्या. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाला संशय आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा उघडला असता कासार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.घटनेची माहिती तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पथकाच्या मदतीने कासार यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
अर्चना कासार यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा पोलीस दलात आहे. पोलिसांत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्या पोलीस सेवेत काही वर्षापूर्वी भरती झाल्या होत्या. त्या जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कासार यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहे. आत्महत्येपूर्वी अर्चना कासार यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.