मुंबई,दि.१७ जानेवारी –
रितेश आणि जिनिलियाचा ‘वेड’ (Ved) हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ‘वेड’ ठरला आहे. रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता ‘वेड’ या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन आता पंधरा दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू कायम आहे.
‘वेड’ हा सिनेमा 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ‘वेड’ ठरला असला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा दुसऱ्या स्थानावर आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेच्या सैराटचा रेकॉर्ड मोडू शकतो आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिल्या स्थानावर येऊ शकतो.
‘वेड’ या सिनेमाने आतापर्यंत 44.92 कोटींची कमाई केली आहे. रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दोन वीकेंडला 33.42 कोटी रुपयांची कमाई झाली. सध्या तिसरा आठवडाही चित्रपटासाठी सकारात्मक आहे. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘वेड’ फक्त नफाच कमवत नाहीये तर मराठी बॉक्स ऑफिसवर तो कमाईचे नवे विक्रमही रचतोय. लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. काही प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.