Homeमहाराष्ट्रहिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ३.६ रिश्‍टर स्केलची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ३.६ रिश्‍टर स्केलची नोंद

हिंगोली,दि.८ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हयातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज (रविवार) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच, नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात विशेषतः वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदारी, कंजारा, पुर, वसई, जामगव्हाण, जलालदाभा, काकडदाभा, वसमत तालुक्यातील पांगरा शिदे, वापटी, कळमनुरी तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, असोला आदी प्रमुख गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला.

सकाळी साडेचार वाजता गावकरी साखर झोपेत असतांना जमिनीतून आवाज अन भुकंपामुळे गावकरी घाबरुन घराबाहेर पडले. मागील काही दिवसांत झालेल्या आवाजापेक्षा आज सर्वात मोठा आवाज ऐकू आल्याचे पिंपळदरीचे गावकरी बापुराव घोंगडे यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या जमीनीतून आवाज अन भूकंपाच्या सौम्य धक्क्याची गावकऱ्यांना जणू सवयच झाल्याचेही त्यांनी सांगितले. या भूकंपाची ३.६ रिश्‍टर स्केल एवढी नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!