अहमदनगर,दि.१८ जानेवारी,(प्रतिनिधी) – राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग जन सशक्तिकरण संस्थान (नवी मुंबई), महानगरपालिका, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध शाळेत शिक्षण घेणार्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साहित्य साधने वितरण करण्यात आले.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यासाठी 100 शैक्षणिक साहित्य संचचा वितरण सोहळा पार पडला. मनपा आयुक्त डॉ. पकंज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अधिव्याख्यात्या रेवती ठाकूर, सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावीत, उपप्राचार्य डॉ. मंगल भोसले, मनपा प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात, मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थानचे नोडल ऑफीसर ज्ञानेश्वर सावंत, सुरेश बेडके आदी उपस्थित होते.
दिव्यांग जन सशक्तिकरण विभागच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील विविध 67 ठिकाणी दिव्यांगासाठी मोफत साहित्य साधने वितरण करण्यात आले. या उपक्रमातंर्गत शहरात दिव्यांगांना मोफत साहित्य साधनाचे वाटप करण्यात आले.
मनपा आयुक्त डॉ. पकंज जावळे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी हा समाजातील एक घटक असून, त्यांना प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य आहे. अनेक दिव्यांग बांधवांनी परिस्थितीवर मात करुन उच्च पदावर गेले असून, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणार्या साहित्य उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मनपा प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी शहरात समग्र शिक्षा समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. दिव्यांगांना साहित्य साधने वाटपासाठी समग्र शिक्षा समावेशित शिक्षणातील विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांनी परिश्रम घेतले.