अहमदनगर,दि.२६ जानेवारी,(प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अद्यापही कलह सुरुच आहे. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना निलंबित केल्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे अहमदनगर जिल्ह्यात वर्चस्व आहे. अध्यक्षासह अनेक पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करून नाना पटोले यांनी थेट बाळासाहेब थोरात यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष नितीन शिवशरण यांनी राजीनामा दिला.
अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी वृत्तपत्रांतून तांबे यांना पाठिंब्याची भूमिका मांडली. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस धाडली. त्या नोटीशीला उत्तर न देता साळुंखे यांनी आपला राजीनामाच सादर केला आहे. ज्या तारखेला बाळासाहेब साळुंखेचा राजीनामा आला त्याच तारखेने त्यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्रही आले. त्यामुळे आता राजीनामा आधी की निलंबनाची कारवाई आधी? असा प्रश्न काँग्रेससमोर पडला आहे.