अहमदनगर,दि.१४ फेब्रुवारी,(अशोक बडे) – जगातील सर्च प्रेमींसाठी १४ फेब्रुवारी म्हणजे खास दिवस. पण याच दिवशी सकाळी ११ वाजता अहदनगर शहरातील दिलासा पथकाने अल्पवयीन (१८ वर्षाच्या आतील) प्रेमीयुगुलाना चांगलाच धडा शिकवला आहे. नगर शहरातील एका बागेत अशाच अल्पवयीन चार – पाच जोड्या बसल्या होत्या. मुलींना छेड-छाडीपासून संरक्षण मिळावे यासाठी नगर शहरात पोलीस विभागाकडून दिलासा पथक तैनात करण्यात आलेले आहे. १४ फेब्रुवारीच्या दिवशी भावनेच्या भरात अल्पवयीन मुलींच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिलासा पथकाने शहरात रेकी केली. दिलासा पथकाला नगर शहराच्या मध्यभागातील बागेत चार – पाच अल्पवयीन प्रेमी युगालांच्या जोड्या दिसून आल्या.
पथकाने त्या सर्वांना ताब्यात घेऊन वय विचारले असता ते सर्व १८ च्या आत असल्याची खात्री झाली. क्लास सोडून असले कुटाने सुचतात काय तुम्हाला असे पथकातील महिला अधिकाऱ्यांनी खडसावून विचारले.सर्व मुले – मुली निरुत्तर झाले. दिलासा पथकाच्या प्रश्नाच्या फैरीने अल्पवयीन प्रेमिंच्या बत्त्याच गुल झाल्या.अनेक जण सैर भैर होऊ इकडे तिकडे पळत होते. काहींनी सुरुवातीला हा माझा भाऊ असल्याच्या खोट्या आणा – भाका सांगितल्या. अनेक जण सोडून देण्यासाठी हाता पाया पडत होते. मोठ मोठ्याने रडत होते. दिलासा पथकातील महिलांनी त्यांना दरडावून सांगितले आता गाडीत बसून पोलीस स्टेशनला चला. तुमच्या पालकांसमोर तुम्हाला योग्य अशी समज देऊन सोडण्यात येईल.