अहमदनगर,दि.१८ जानेवारी,(प्रतिनिधी) – भिंगार छावणी परिषदेत सुरु असलेली सफाई कामगाराची सरळ भरतीला तातडीने स्थगिती देऊन अनुकंपा भरतीच्या जागा भरुन घेण्यास प्राधान्य द्यावे व भरतीच्या जाचक नियमात बदल करण्याची मागणी भारतीय वाल्मिक संघटनेच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवर गोहेर, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रवि गोहेर, जिल्हा अध्यक्ष नरेश चौहान, अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव संजय, खरे, सामाजिक कार्यकर्ते दिपक नकवाल, सिद्धार्थ चौहान, आतिश गोहेर, ऋतिक चौहान, पवन सेवक, दिलीप सुर्यवंशी, धीरज बैद आदींसह अनुकंपाधारक उमेदवार उपस्थित होते.
भिंगार छावणी परिषदेत सुरु असलेल्या सफाई कामगारांच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये अनुसुचीत जाती संवर्गशुन्य आहे. झालेली भरती ही संशयास्पद असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. छावणी परिषदेच्या अनुकंपा भरतीचे 13 उमेदवार मागील नऊ ते दहा वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यांना डावलून ही भरती करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अनुकंपा भरतीच्या जागा सीनियरिटी प्रमाणे भरावी यामध्ये कोणतेही बदल करु नये, अनुकंपा खालील वय वाढत असलेल्या उमेदवारांना अगोदर भरती मध्ये प्राधान्य द्यावे, अनुकंपा भरती प्रक्रियेची पदे भरण्यासाठी 5 टक्केचा कोटा वाढवून 20 टक्के करण्याची मागणी भारतीय वाल्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी दखल घेऊन कार्यवाही न केल्यास 2 फेब्रुवारी पासून छावणी परिषदेच्या कार्यालया समोर अनुकंपा भरतीच्या उमेदवारांसह आमरण उपोषण करण्याचा व वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.