अहमदनगर,(प्रतिनिधी) – कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं. यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला. तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत. मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केलीहे. केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षीपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे. मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही.