मुंबई, २२ जानेवारी,-
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु असीम आझमी यांना औरंगजेबाला पाठिंबा दिल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींच्या स्वीय सहायकाला हा धमकीचा फोन आला होता. औरंगजेबाला पाठिंबा दिल्याबद्दल आझमींना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्या स्वीय सहायकाला आला.आझमींच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अबु आझमींना याआधीही जीवे मारण्याची धमकी आली होती. जुलै २०२२ मध्ये आझमींच्या स्वीय सहायकानेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आझमींच्या पक्षाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.