सावेडीत सोमवारी दिवाण परिवाराचे रक्तदान शिबीर
अहमदनगर,दि.५ मार्च,(प्रतिनिधी) – थॅलेसेमिया आजाराने निधन झालेल्या अनुमयदिवाण या मुलाच्या स्मृती जपण्यासाठी सावेडीतील गुलशन व राजकुमार दिवाण या दाम्पत्याने 21 वर्षांपूर्वी सुरू केलेला रक्तदान शिबीर उपक्रम आता रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करतो आहे. यंदाचे 22 वे रक्तदान शिबीर त्यांनी सोमवारी (6 मार्च) सकाळी 9 ते दुपारी 2 या दरम्यान सावेडी नाक्यामागील शुभमंगलकार्यालयात आयोजित केले आहे. यात रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनीकेले आहे.
मुलाचे निधन थॅलेसेमिया आजाराने झाले असल्याने या आजाराने त्रस्तअसलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता पडू नये म्हणून मागील 20 वर्षांपासून दिवाणदाम्पत्याने रक्तदान शिबीर उपक्रमाची सुरुवात केली. यंदाचे त्यांचे शिबीर थॅलेसेमियाआजाराने त्रस्त रुग्णांसह एकूणच रक्ताची मागणी वाढल्याने व त्या तुलनेत रक्तपुरवठा अपुरा पडत असल्याने त्यात खारीचा वाटा उचलावा, या हेतूने आयोजित केले आहे. प्रत्येकाला समाजसेवा करायची असते, पण समाजसेवेच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, पण रक्तदान शिबिराची संकल्पना जीवनदान देणारी असल्याची भावनाही यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाण दाम्पत्याने आतापर्यंत अडीच हजारावर रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. थॅलेसेमिया रुग्णांना रक्तपेढ्यांद्वारे मोफत रक्तपिशवी दिली जाते. पण ती त्यांना वेळेत उपलब्ध व्हावी म्हणून दिवाण दाम्पत्याद्वारे रक्तदान शिबिरांद्वारे रक्तपिशव्यांचे संकलन करून ते विविध रक्तपेढ्यांना दिले जाते. थॅलेसेमिया आजाराने त्रस्त रुग्णांना कमीतकमी 15 ते 21दिवसांनी नवे रक्त द्यावे लागते. त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या रक्तनिर्मिती होत नसल्याने त्यांना सतत रक्ताची गरज भासते. रक्तपेढ्यांतून यासाठी मोफत रक्तपिशव्या दिल्या जातात. पण अपघात, शस्त्रक्रिया वा अन्य आजाराच्या रुग्णांनाही रक्तपिशव्यागरजेच्या असल्याने रक्तपेढ्यांसमोर अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे त्यांनाथॅलेसेमिया रुग्णांना देण्यासाठी रक्तपिशव्या कमी पडू नये म्हणून दिवाण परिवाराद्वारे दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. यंदाचे शिबीर उद्या सोमवारी होणार असून, यात सहभागी होऊन थॅलेसेमियासह सर्व रुग्णांसाठी रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-9890209976.