मुंबई,दि.८ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या २३ जानेवारी रोजी एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण या दिवशी होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकदाही एकत्र आलेले नाहीत.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात ठाकरे काही वेळ विधान परिषदेत उपस्थित होते. मात्र, त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे दोघेही सभागृहात नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते प्रथमच एकत्र येतील. ठाकरे यांना या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण पाठविण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, विख्यात गायिका आशा भोसले यांना देखील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असल्याने ते हे निमंत्रण स्वीकारतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.