Homeमहाराष्ट्रविजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी नगर - पुणे वाहतूक मार्गात बदल

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी नगर – पुणे वाहतूक मार्गात बदल

अहमदनगर,दि.३१ डिसेंबर,(प्रतिनिधी) – कोरेगाव भीमा व पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक शनिवारी (दि. ३१) रात्रीएपासून बंद राहणार असून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी दिले आहेत.

विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी वाहतूक ही खराडी बायपास येथून उजवीकडे वळून केशवनगर मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील. सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी वाहतूक हडपसर मगरपट्टा चौक येथे उजवीकडे वळून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जाईल.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमुळे चार वर्षांपासून प्रशासन विशेष दखल घेत आहे. यावेळी देखील अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरात येणाऱ्या समाज बांधवांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परिसरातील काही किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तर १ जानेवारी रोजी अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकणमार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण शिक्रापूर दिशेने तसेच खराडी मार्गे हडपसर, केडगाव चौफुला मार्गे शिरूर दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात येणार आहेत. आळंदी बाजूने अहमदनगर कडे जाणारी वाहतूक मरकळ, शेलपिंपळगावमार्गे शिक्रापूर बाजूने वळविण्यात येणार आहे.

सहकार्याचे आवाहन
पुणे-नगर रस्त्यावरील गावांमध्ये येणाऱ्या समाजबांधवांचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष स्वागत देखील यावेळी करण्यात येणार आहे. तर १ जानेवारी रोजी नागरिकांनी देखील वाहनांचा वापर न करणे सोयीस्कर राहणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वतंत्र बसची व्यवस्था
पेरणे फाटा व कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांसाठी कोरेगाव भिमा, पेरणे फाटा येथून काही अंतरावर ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तेथून शासनाकडून स्वतंत्र बसची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

अभिवादन सोहळ्यासाठी १ हजार ५०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून, १५० अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. २१ आरोग्य पथकात २४० कर्मचारी, ४१ रुग्णवाहिका, बाईक अ‍ॅम्ब्युलन्स, ३८ घंटागाडी, १० अग्निशमन वाहने, १७५ कचारकुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!