कोपरगाव,दि.३ जानेवारी,(प्रतिनिधी) – गॅस टँकरमधून कमी दरात गैरकायदेशीरपणे व्यावसायिक सिलेंडर भरून ते चढ्या दराने विकणाऱ्या टोळीला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. एच.पी कंपनीच्या टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करत व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरतांना व त्याची साठवणुक करणाऱ्या टोळीला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत २८ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत संगमनेर व कोपरगाव रोडवर सोमवारीरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास केली.
डॉ. बी. जी. शेखर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने सोमवारी रोजी रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील संगमनेर कोपरगाव रोडवर जेऊरकुभांरी शिवारात यु.पी. हरियाणा राजस्थानी ढाब्याच्या समोरील मोकळ्या जागेत बुधाराम आनंदाराम विष्णोई, प्रकाश भगीरथरामजी विष्णोई, भुराराम कोजाराम जानी, सुखराम विष्णोई सर्व राहणार राजस्थान व धर्मेंद्रकुमार बचानु बिंद रा. उत्तरप्रदेश, हल्ली सर्व राहणार यु. पी. हरियाणा राजस्थानी ढाबा जेऊरकुमारी, तालुका कोपरगाव यांनी संगनमत करून हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमधुन मुंबई येथून गॅसने भरलेले टँकर (वाहन क्र. एम.एच.४३ बी.जी. ७१५०) मध्ये चालक डिलेव्हरी करण्यासाठी जात असतांना गॅसचे भरलेले टँकर कंपनीने नेमुन दिलेल्या डेपो वर डिलेव्हरी करण्यासाठी घेवून न जाता त्यातील काही गॅसची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी गॅस टँकर मधून बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडर भरण्याचे साहीत्य व साधने वापरून सदर टँकर मधील ज्वालाग्रही गॅस आवश्यक ती खबरदारी न घेता अवैधरित्या व्यवसायिक सिलेंडर मध्ये गॅस काढून घेवून भरतांना व साठवणुक करतांना पाच जण पोलिस पथकाला मिळाले आहे. एकुण २८ लाख रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.