मुंबई,दि.७ जून,(ऑनलाईन प्रतिनिधी) – उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैरण झाले आहे. सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पण अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. अशामध्ये मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून येत्या २४ ते ४८ तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र अरबी समुद्रावर तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती. आता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनचा पुढील प्रवास मात्र वातावरणाच्या अनुकूलतेवर अवलंबून असणार आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात बिपोरजॉय चक्रीवादळ तयार झाल्यामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणूनच देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.