अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – HMPV विषाणूमुळे राज्य सरकार अलर्टमोडवर आहे. नागपूरमध्ये HMPV चे दोन रूग्ण आढळल्यामुळे उपाययोजना करण्यासाठी सरकारने टास्कफोर्सची स्थापना केली आहे. एकीकडे राज्यावर HMPV चे सावट असतानाच बुलढाण्यात मात्र अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातलाय. या व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेगावमधील काही गावांत ही गंभीर समस्या जाणवत आहे, अचानक टक्कल पडत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची कुटुंब ची कुटुंब बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेगाव तालुक्यात केस गळतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे. वेगळ्या व्हायरसची एन्ट्री झाली का? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. बुलढाण्यातली शेगाव तालुक्यात काही गावामधे नागरिकांना केसगळतीची समस्या जाणवत आहे. तीन दिवसांतच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी खासगी रूग्णालयाची वाट धरली आहे, मात्र अद्याप हे का होतेय, याचं कारण समजू शकले नाही.
शाम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा असे काही डॉक्टरांचे मत आहे. पण कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती. कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिले आहे. आता सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे नागरीक डोळे लावून बसले आहेत.