अहमदनगर,दि.१७ जानेवारी,(प्रतिनिधी) – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरातून 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत रुपीबाई मोतीलाल बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेवून करण्यात आली. या रॅलीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, रुपीबाई बोरा विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, मोटार वाहन निरीक्षक सुनिल पाटील, श्याम चौधरी, गोरक्ष कोरडे, अमृता वांढेकर, हनुमंत पारधे, कल्पेश सुर्यवंशी, विलास धुम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज उबाळे, राकेश जगताप, कल्पेश सूर्यवंशी, सुकन्या क्षेत्रे, हर्षल जगताप, रुपाली खरसे, सोनाली शिरसाठ, मनोज रुद्रावंशी, विशाल साळवे, गरड, राजराम गीते, ढेरे पाटील, एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता मुकुंद नगराळे, चालक विठ्ठल पालवे, महादेव गिते आदी वाहन चालक-मालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. वॉक ऑन राईट या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी जागृती केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख चौकातून या रॅलीचे मार्गक्रमण झाले. रस्ता सुरक्षेविषयीच्या घोषवाक्यांचे फलक घेऊन विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. रुपीबाई बोरा विद्यालयात या रॅलीचे समारोप होऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे म्हणाले की, रस्त्यावर येताना वाहन चालकांनी आपल्यासह इतरांची काळजी घ्यावी. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात अपघात कमी होणार आहे. मोठ्या प्रमाणात अपघातामध्ये अनेकांचे जीव जात असून, कर्तव्य म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट व कार चालवताना सीटबेल्टचा वापर तसेच इतर नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.