नगर संचार ऑनलाईन वृत्त, दि.१८ डिसेंबर – फिफा 2022 विश्चचषकाचा (FIFA World Cup 2022) अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला (France) नमवून अखेर अर्जेंटिनाने (Argentina) फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. अगदी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात मेस्सीच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल 36 वर्षाने आपल्या संघाला विश्वचषक मिळवून दिला आहे. लिओनेल मेस्सीला आतापर्यंत अनेकदा विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्याने आणि त्याच्या संघाने तुफान कामगिरी करत कतारमध्ये 2022 चा विश्वचषक दिमाखदारपणे पटकावला आहे. निर्धारित वेळेत सामना 2-2 बरोबरीत सुटला. जादा वेळेत 3-3 बरोबरी झाली.
पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशी सरशी साधत अर्जेंटिनाने जेतेपदावर कब्जा केला. तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. आधुनिक फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या नावावर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्हती. हा सल मेस्सीने दोन गोल करत भरुन काढला आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणाची अनुभूती अनुभवली.

हा वर्ल्डकप माझा शेवटचा असेल असं मेस्सीने आधीच जाहीर केलं होतं. जेतेपदासह अर्जेंटिनासाठीच्या कारकीर्दीची सांगता करत मेस्सीने चाहत्यांना हवीहवीशी भेट दिली.
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखत एकावर एक गोल केले. फ्रान्ससाठी मात्र पेनल्टी शूटआऊट निराशादायी ठरला. अर्जेंटिनातर्फे माँटियल, पेरडेस, डायबाला आणि मेस्सी यांनी गोल करत अर्जेंटिनाला थरारक विजय मिळवून दिला.
एक्स्ट्रा टाइममध्ये लिओनिल मेस्सीने पुन्हा एक गोल करत 3-2 अशी आघाडी मिळवली. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकला, पुढील काही मिनिटातच एम्बापेनी तिसरा गोल करत सामना बरोबरीत आणला.
108व्या मिनिटाला लौटारे मार्टिनेझने गोल दागला पण फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसने तो छातीवर बॉल घेत अडवला. तिथेच असणाऱ्या मेस्सीने हलकेच बॉलला गोलपोस्टमध्ये ढकललं, फ्रान्सच्या उपमेकानोने गोलपोस्टमधून तो परतावला पण तो स्वत: गोलपोस्टमध्ये असल्याने अर्जेंटिनाचा गोल झाला आणि त्यांच्या चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतलं.
79व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. फ्रान्सचा हुकूमी एक्का एम्बापेने अर्जेंटिनाचा गोलकीपर ज्या दिशेने झेपावला त्याच दिशेने गोल दागला. एम्बापेच्या वेगाने गोलकीपरला भेदलं आणि फ्रान्सने गोलचं खातं उघडलं.
आणखी दोन मिनिटात, मार्कस लिलिआन थुरुम युलियनच्या वेगवान पासवर तितक्याच वेगाने एम्बापेने थरारक गोल करत फ्रान्सला बरोबरी करुन दिली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात फ्रान्सने बॉलवर नियंत्रण मिळवत दणका उडवला.
माँटेइलने एम्बापेचा फटका रोखायचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बॉल त्याच्या हाताला लागला. रेफरींनी फ्रान्सला पेनल्टी जाहीर केली. एम्बापेने हॅट्ट्रिक करत फ्रान्सला बरोबरी करून दिली.