अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – भारतीय सैन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अहिल्यानगरमधील प्रसिध्द आशा भेळ सेंटरचे संचालक रमेश शांतीलाल बनभेरु यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.पुखराज राठोड यांनी सदर नियुक्ती पत्र दिले आहे. व्यवसाय करतानाच समाजाला संघटीत करणे तसेच सामाजिक कार्य करीत असल्याने बनभेरु यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलताना रमेश बनभेरू म्हणाले, भारतीय सैन समाजाच्या प्रदेशाध्यक्षपदी मिळालेली नियुक्ती आनंददायी आहे. हे एक जबाबदारीचे पद असून सर्व सैन समाजाला एकत्र आणून प्रत्येकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जातील. शासनाच्या विविध सामाजिक, व्यावसायिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी समाजबांधवांना मार्गदर्शन केले जाणार आहे. समाजात जागृती निर्मिण करणे, मुलांना चांगले शिक्षण मिळवून देणे, समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे बेटी बचाव, बेटी पढाव अभियान राबविण्यात येईल. याशिवाय वेळोवेळी वधूवर परिचय संमेलनाचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट असून व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रबोधन केले जाणार आहे. समाजाच्या कार्यात मला नेहमीच बंधू ललित बनभेरू यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे. सर्व सैन समाज बांधव मला विविध उपक्रम राबविताना सहकार्य करतील असा विश्वास बनभेरू यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल रमेश बनभेरू यांचे विविध मान्यवर तसेच समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.