कर्जत,(प्रतिनिधी) – महायुती सरकारच्या काळामध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जनतेच्या हिताची विविध विकासकामे केली. त्यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण, आरोग्य, विज पुरवठा, रस्ते, कुकडीचे आवर्तन, श्री जगदंबा देवी भक्तनिवास यासह विविध धार्मिक स्थळांसाठी निधी उपलब्ध करून दिला. जनतेशी नाळ जोडली असल्याने राम शिंदे हे अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहेत. कर्जत जामखेड मतदार संघाच्या प्रगतीसाठी राम शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा तसेच महाविकास आघाडीला हद्दपार करा असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी केले. ते राशीन येथे कर्जत जामखेड मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री जगदंबा देवी मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी तुम्हाला आरक्षण देणार नाही, भगवा झेंडा हाती घेऊन जातीवाद करतात, विकासापासून वंचित ठेवणार आहे. महाविकास आघाडी नसून ही महा भकासआघाडी आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आव्हान केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते.
विखे पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, महायुती सरकारच्या काळामध्ये विविध योजनांची फक्त घोषणा न करता त्याची अंमलबजावणी केली. लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर जे कोर्टामध्ये गेले होते. त्यांना लाडक्या बहिणींनी दारामध्ये सुद्धा उभा करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी ही फक्त सत्तेसाठी तयार झाली आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये पिक विमा, दुधाचे अनुदान, लाडकी बहीण योजना, वीज बिल माफी योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राम शिंदे यांना जनता प्रचंड मतांनी विजयी करणार आहे. त्यामुळे आ. रोहित पवार हे महाराष्ट्राचे नाही तर गल्लीचेही नेते राहणार नाहीत असे भाषण त्यांनी केले.
यावेळी शिंदे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, आमदार राम शिंदे यांनी काय काय विकास केला हे जनतेला दाखवावा. राशीन, कर्जत, जामखेड येथील पाणीपुरवठा योजना मी मार्गी लावली. बारामती – अमरापुर, अहिल्यानगर – सोलापूर , दौंड – धाराशिव मार्ग, देऊळवाडी चे 432 के व्हीचे विद्युत केंद्र सरकारच्या काळामध्ये केले. तसेच गणेशवाडी, काळेवाडी, चिलवडी , ढगे वस्ती या विविध भागांमध्ये रस्ते तयार केले. कुकडीच्या पाण्याचे आवर्तन आणले. मतदारसंघातील शेतकऱ्यांना जे लागते ते या भूमिपुत्राने दिले आहे. जनतेनेच ही निवडणूक हातामध्ये घेतली असून जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवेल असे सांगीतले. जनतेने आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
राशीन मधील क्रिकेटचे स्टेडियम हे निवडणुकीचा जुमला आहे .तरुणांना ड्रायव्हिंग लायसन दिले नाही .त्यांची फसवणूक केली . आ .रोहित पवार यांचे परकिय अतिक्रमण हटविण्याचा जनतेने निर्धार केला आहे अशी टीका केली. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा. राम शिंदे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, प्रवीण घुले, मधुकर राळेभात, शहाजी राजेभोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमुरे, जिल्हा उपाध्यक्ष बापू धोंडे, पांडुरंग भंडारे, शहराध्यक्ष शिवाजी काळे , शांतीलाल कोपनर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, अल्लाउद्दीन काझी यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते कार्यकर्ते यांच्यासह हजारो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सभेची प्रस्ताविक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू धोंडे यांनी केले. सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी तर आभार युवक नेते शहाजीराजे भोसले यांनी मानले.