निबंध स्पर्धेत सब्बन प्रथम, पवार द्वितीय तर खेडकर तृतीय
अहमदनगर,प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अहमदनगर जिल्हा जाहिरातदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मतदारांना प्रेरणा मिळण्यासाठी या स्पर्धेतील उत्कृष्ट निबंध, मतदान केंद्राबाहेर लावण्यात येतील. असे प्रतिपादन प्रांताधिकारी तथा लोकसभा निवडणुकीतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.
मतदान टक्का वाढविण्यासाठी जाहिरातदार संघटनेचा उपक्रम
संघटनेच्या वतीने आयोजित ‘मतदान माझा हक्क आणि तो मी बजावणारच’ या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय शिंदे हे होते. यावेळी जिल्हा जाहिरातदार संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख, फेमचे उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा, संघटनेचे सचिव प्रसाद मांढरे, उपाध्यक्ष गुलशन अरोरा, प्रकल्प प्रमुख प्रमोद गांधी, पदाधिकारी राजेंद्र म्याना, सुरेंद्र मुथा यांच्यासह स्पर्धक व मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साईगीता गणेश सब्बन यांना द्वितीय क्रमांक सुवर्णा दीपक पवार, तृतीय क्रमांक सुप्रिया निलेश खेडकर यांना तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक शेख मिराबक्ष खुदाबक्ष बागवान, द्वितीय क्रमांक मोनाली गणेश बोरुडे यांनी पटकावला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य आर. एन. सुंबे यांनी काम पाहिले. यावेळी प्रांताधिकारी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक प्रौढ नागरिकांस मतदार यादीत नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आहे. मतदान हा केवळ मूलभूत हक्क नसून कर्तव्य आहे.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, सोमवारी १३ मे या दिवशी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. प्रत्येकाने स्वतः मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच आपल्या संपर्कातील प्रत्येकाला यासाठी प्रेरित करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मुथा यांनी तर स्वागत राजेंद्र म्याना यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद गांधी यांनी तर आभार सुरेंद्र मुथा यांनी मानले.