अहमदनगर,दि.५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवचैतन्य व तोच विचारांचा झंझावात घेऊन जनसामान्यांमध्ये कार्य करत आहे. पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने नव्याने पक्ष बांधणी सुरु झालेली असून, सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेऊन सामाजिक बांधिलकीने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) मध्यवर्ती जिल्हा पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी असलेला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या नियोजनार्थ जिल्ह्यातील पदाधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. याप्रसंगी राज्य प्रवक्ते संजीव भोर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबुशेठ टायरवाले, बंडू रोहोकले आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे जिल्हाप्रमुख शिंदे म्हणाले की, फ्लेक्स व इतर वायफट खर्च टाळून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प असून, जिल्हाभर विविध प्रकारचे आरोग्य शिबीर व सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे. तर शहरात गरजूंना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य प्रवक्ते संजीव भोर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणात सर्व भारताचे लक्ष वेधले आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व सत्तेवर आलेले आहेत. अहोरात्र ते समाजासाठी उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना थेट मुख्यमंत्री पर्यंत जाता येते. सर्वसामान्यांना न्याय व कार्यकर्त्यांना ताकत देणारा हा पक्ष आहे. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे असल्याचे त्यांनी सांगितले. तर येणार्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या सर्व जागा राखून नवीन जागेसाठी पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
दिलीप सातपुते यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. तर पक्ष संघटनसाठी गावोगावी शाखा सुरु करण्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक सचिन जाधव यांनी जुन्या कार्यकर्त्यांची असलेली शिवसेनेची नवीन बांधणी उत्साहात सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट झाल्यास मित्र पक्षाकडून काही जागा मागून घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांच्या हस्ते दक्षिणेतील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांचा हा पहिला वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस त्यांच्या विचाराप्रमाणे जनसामान्यांच्या सेवेतून साजरा केला जाणार आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे. गावोगावी शाखा निघाल्यास पक्षाची ताकद वाढणार आहे. पद घेऊन कोणी मोठा होत नसतो, त्यासाठी जनसेवा करावी लागते. कार्यकर्त्यांना मोठे होण्यासाठी अगोदर पक्षाची ताकद वाढवावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
——————-
शिवसेना (बाळासाहेबांची) पक्षातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे:- दलित आघाडी प्रमुख- पोपटराव पाथरे, युवा सेना नगर उपतालुका प्रमुख- सचिन ठोंबरे, उपशहर प्रमुख- आनंद वाळके, युवा सेना उपशहर प्रमुख- अक्षय शिंगवी, प्रसिध्दी प्रमुख- प्रल्हाद जोशी, युवा सेना जिल्हाप्रमुख (शेवगाव-पाथर्डी)- साईनाथ आधाट, जिल्हा संघटक (राहुरी, शेवगाव, पाथर्डी)- अमोल हुबे, युवा सेना शहर प्रमुख- महेश लोंढे, उपजिल्हाप्रमुख (शेवगाव)- दिलीप भागवत, युवा सेना जिल्हा प्रमुख- आकाश कातोरे, कर्जत तालुका प्रमुख- बापूसाहेब नेटके, श्रीगोंदा उपजिल्हाप्रमुख- संतोष इथापे, श्रीगोंदा युवा सेना शहरप्रमुख- संदीप गोविंद भोईटे , जामखेड युवा सेना तालुकाप्रमुख- सुमित वराट , जामखेड शहर प्रमुख- देविदास भादलकर, युवा सेना कर्जत तालुका प्रमुख-सोमनाथ शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख (श्रीगोंदा-कर्जत)- अभिषेक भोसले, युवा सेना जिल्हाप्रमुख (पारनेर, राहुरी) योगेश गलांडे, नगर तालुका उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके, उपशहर प्रमुख- राजू कोंडके.