अहमदनगर,दि.५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील ऋचा देवीप्रसाद सोहोनी या विद्यार्थीनीने त्यांचे सुंदर पेन्सिल स्केच काढून अभिनव पध्दतीने आदरांजली अर्पण केली आहे. कोट्यवधी रसिकांवर आपल्या जादूई आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर यांचा सूर अजरामर आहे. त्यांचे स्केच काढताना सोहोनी हिने अतिशय कल्पकता दर्शवली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऋचा सोहोनी ही श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता नववीत शिकते. कोविड काळात तिने ऑनलाईन चित्रकला क्लास सुरू केले आणि आज पर्यंत अनेक स्पर्धांमधून तिने बक्षिसे मिळविली आहेत. मागील वर्षी स्वच्छ भारत अभियनांतर्गत अहदनगर महानगर पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत तिला पारितोषिक प्राप्त झाले. नुकत्याच अहमदनगर रायझिंग आणि आशा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत देखील तिला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून तिने केवळ काही तासात पेन्सिल स्केच काढले आहे. अहमदनगर येथील सुप्रसिध्द नाटककार देवीप्रसाद उर्फ योगेश सोहोनी यांची ती कन्या आहे.