अहमदनगर,दि.२२ डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. चीन आणि अमेरिकेत पुन्हा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चीन आणि अमेरिकेत कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोनाच्या परिस्थितीबाबत दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत तेथील कोरोनाच्या BF.7 या चिनी व्हेरियंटने मोठा हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. मृतांचा खच पडला तर अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्या. या पार्श्वभूमीवर भारतातील कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यानी वरिष्ठ अधिका-यांसह बैठक घेतली.
यावेळी त्यांनी भारतात स्थिती नियंत्रणात आहे. ज्या चिनी BF.7 व्हेरियंटमुळे चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. तो सप्टेंबरमध्येच भारतात आला होता. सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यात कोरोना खूप वेगाने फैलावतो. असे आतापर्यंतचे संशोधन आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 4 रुग्ण आढळले. यामुळे या व्हेरिएंटचा भारतात फारसा परिणाम आढळणार नाही. लसीकरण मोहिमेचा चांगला परिणाम आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मांडविया यांनी म्हटले आहे, चीनचा हा खतरनाक BF.7 व्हेरियंट सप्टेंबरमध्येच भारतात आला होता. वडोदरातील एका एनआरआय महिलेमध्ये याची लक्षणे आढळले होती. ही महिला अमेरिकेतून वडोद-यात आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या अन्य दोघांचीही तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. नंतर ही महिला ठीक झाली होती. याशिवाय BF.7 च्या अन्य दोन केस अहमदाबाद आणि ओडिसामध्ये आढळल्या होत्या.
ज्या BF.7 ने चीनमध्ये एवढा हाहाकार उडवला आहे. त्याचा परिणाम भारतात फारसा आढळलेला नाही. सप्टेंबरमध्येच भारतात येऊनही डिसेंबरपर्यंत फक्त चार रुग्ण आढळले. याचे श्रेय भारताने केलेले उत्तम नियोजन आणि मोठ्या प्रमाणात राबवलेल्या लसीकरण मोहीमेला जाते. लसीकरणामुळे या व्हेरियंटचा प्रसार रोखणे शक्य झाले. आतापर्यंत 220 कोटींचा लसीचा आकडा भारताने पार केला आहे. यामध्ये अनेकांना बुस्टर डोस देखील देण्यात आला आहे. भारतात वेगाने लसीकरण मोहीम आणि बुस्टर डोस दिल्यामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. बीएफ.7 चा आतापर्यंत भारतावर परिणाम झाला नसला तरी देखील खबरदारी म्हणून आधीच उपाययोजना करणे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करत आहे. जेणेकरून या व्हेरियंटचा भारतात प्रसार होणार नाही.
बैठकीनंतर नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या बैठकीची माहिती दिली. पॉल म्हणाले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा फैलाव इतर देशांत होत असला तरी, याला घाबरण्याची गरज नाही. तथापि, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा. पुरेशा प्रमाणात टेस्टिंगची सुविधा आहे. त्यामुळे वेळीच टेस्ट करून घ्यावी आणि त्यानुसार उपाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान, काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.