अहमदनगर,दि.३१ जानेवारी,(प्रतिनिधी) – निधी मंजूर असलेल्या सावेडी येथील नाट्य संकुल व गुलमोहर रस्त्याचे रखडलेले विकास काम त्वरीत मार्गी लावण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन सदर प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. तर हा प्रश्न येत्या आठ दिवसात न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, युवक शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, युवतीच्या शहराध्यक्ष अंजली आव्हाड, सचिन अकोलकर, चैतन्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी विशेष प्रयत्नातून सावेडी येथील नाट्य संकुल व गुलमोहर रस्त्यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला निधी उपलब्ध करुन दिला आहे. गुलमोहर रस्ता व सावेडी नाट्य संकुल हे महत्त्वकांशी व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या कामासाठी निधी उपलब्ध असूनही, ठेकेदार व मनपा अधिकारी यांच्या हेव्यादाव्यामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे कामे रखडलेली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आला आहे. शहरातील गुलमोहर रस्ता शासकीय तसेच महत्त्वाच्या कार्यालयांसाठी जाण्या-येण्याचा प्रमुख रस्ता आहे. तर सावेडी उपनगराला जोडणारा मुख्य रस्ता आहे. मिळालेल्या निधीतून सदर रस्ता व नाट्य संकुलाचे अर्धवट कामे झालेले आहेत. अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे सदरील कामे रखडली गेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
“निधी उपलब्ध असताना देखील वैयक्तिक हेव्यादाव्यातून जनतेला वेठीस धरण्याचे काम महापालिकेतील जबाबदार अधिकारी करत आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे जनता भरडली जात असून, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गुलमोहर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.” – सुमित कुलकर्णी