पाल्यावरील अपेक्षांचे ओझे कमी होणे गरजेचे घरात सुसंवाद महत्त्वाचा – वि.भा.साळुंखे
आष्टी,दि.२७ जानेवारी,(प्रतिनिधी) – ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचा अती मोबाईल वापर हा दिवसेंदिवस वाढत असून यामुळे याचे विपरीत परिणाम देखील समोर येत असल्याने भविष्यात ही चिंतेची बाब असेल. आपल्या मुलांकडून अपेक्षा जरूर ठेवा मात्र ‘सोशल स्टेटस’ टिकवण्यासाठी आपल्या मुलांवर नाहक अपेक्षांचे ओझे टाकणे हे धोकादायक आहे. म्हणून पालकांची जबाबदारी ही आहे की, अपेक्षांचे ओझे न लादणे तसेच विद्यार्थ्यांनी देखील कसल्याही प्रकारचे दडपण मनावर न घेता आपल्या परीने सर्वोत्तम कसे देता येईल या साठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत शहरातील लक्ष्मी लॉन येथे आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी वि.भा.साळुंखे यांनी केले. यावेळी आ.सुरेश धस, यांच्यासह गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, संपर्क अधिकारी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस, मुख्याध्यापक सुरेश पवार, मुख्याध्यापक खताळ, भगत सर, पत्रकार यांच्यासह विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत आहेत.या उपक्रमांतर्गत शुक्रवारी आष्टी शहरातील लक्ष्मी लॉन येथे विद्यार्थांना आ.सुरेश धस यांच्या वतीने हे संभाषण एल.ई.डी.स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.या प्रसंगी वि.भा.साळुंखे यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा अती वापर टाळण्याचे सांगत विद्यार्थी दशेत सर्वांनी आपल्या बुध्दीमत्तेला चालना मिळण्यासाठी काही काळ चिंतन देखील करणे गरजेचे असल्याचे सांगितले. धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात पाल्यांवर पालकांचे अपेक्षांचे वाढते ओझे तणावात नेन्यास कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे पालकांनी पाल्य तणावमुक्त राहण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद देखील साधने गरजेचे असल्याचेही साळुंखे शेवटी म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार सतिष दळवी यांनी केले.