अहमदनगर,दि.२७ जानेवारी,(प्रतिनिधी) – एमआयडीसी येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक एकात्मता व निरोगी आरोग्याचा संदेश देत मिनी मॅरेथॉनमध्ये धावपटू, नागरिक व कामगार वर्ग धावले. फोक्सवॅगन शोरुमच्या वतीने एसपीजे ग्रुपच्या सहकार्याने प्रजासत्ताक रनचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी धावपटू राजेश पालवे यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज फडकावून सलामी देण्यात आली. यावेळी रितेश खंडेलवाल, सुनील बनकर, संदीप जोशी, शोरूमचे संचालक रितेश नय्यर आदी उपस्थित होते.
राजेश पालवे म्हणाले की, मनुष्याला आरामदायी जेवढ्या सोयी-सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे त्याचे आरोग्यही तेवढे धोक्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी दररोज चालणे व पळणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रितेश नय्यर यांनी नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व राष्ट्रीय एकात्मता जागरूक करण्याच्या उद्देशाने या रनचे आयोजन करण्यात आले असल्याचे उद्देश सांगितले.
पहाटे कडाक्याच्या थंडीत या 5 किलोमीटरच्या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ एमआयडीसी फोक्सवॅगन शोरुम येथून करण्यात आला. हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…. वंदे मातरम… च्या घोषणा देत रनर्ससह युवक-युवती व महिला अत्यंत उत्साह व जोशपुर्णपणे धावल्या. प्रारंभी संगीताच्या तालावर रनर्सकडून व्यायाम करुन घेण्यात आला. या मिनी मॅरेथॉनला कामगार वर्गासह नागरिकांचा देखील उत्स्फुर्त सहभाग लाभला.