अहमदनगर,दि.२४ जानेवारी,(प्रतिनिधी) – नगर-दौंड महामार्गावर कायनेटिक कंपनीच्या पुढे अहमदनगर-आष्टी हा नवीन रेल्वे मार्ग नुकताच सुरु झाला आहे. या ठिकाणी अद्याप उड्डाणपूल नसल्याने रेल्वे क्रॉसिंग या महामार्गावरूनच होत असते. या रेल्वे क्रॉसिंग फाटकाजवळ एक उसाने भरलेला ट्रक बंद पडला. ट्रक रुळावर बंद पडल्याने मोठी धावपळ उडाली. बंद पडलेल्या ट्रकमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र ट्रक रेल्वे रुळाच्या मधोमध असल्याने वाहतूक सुरळीत होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी क्रेन चालकाला बोलवून ट्रक काढण्याबाबत सांगितले. मात्र क्रेन चालक आणि ट्रक चालक यांच्यामध्ये क्रेनच्या भाड्यामुळे वादावादी झाल्याने ट्रक चालकाने त्या ठिकाणीच ट्रक सोडून पळ काढला. त्यामुळे हा ट्रक रेल्वे रुळाच्या मधोमधच उभा होता.
दोन्हीकडून मोठमोठ्या वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. सुमारे एक तास हा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक वाहन धारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. अखेर कोतवाली पोलिसांनी क्रेन चालकास विनंती करून ट्रक रुळाबाहेर काढण्याची विनंती केली आणि वाहतूक सुरळीत केली. मात्र ही ट्रक बंद पडण्याआधीच एक रेल्वे आष्टीकडे मार्गस्थ झाली होती. त्यामुळे मोठा अपघात टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.