मुंबई, २३ जानेवारी २०२३ –
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. यानिमित्त विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात अनेक जण सामील झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाषण करत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबांचा फोन आल्यावर उरात धडकी भरायची असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचे पालन व्हायचे. ठाणे आणि शिवसेना हे नातंच वेगळं होते. कधी-कधी ठाण्यातील नागरिकांच्या समस्या बाळासाहेबांच्या कानावर पडायच्या. त्यावेळी त्यांचा अचानक फोन यायचा, बाळासाहेबांचा फोन बघितल्यावर उरात धडकी भरायची, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता, अशी आठवण शिंदे यांनी काढली.’ही जादू फक्त बाळासाहेबांचीच’
‘एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचे काम केले आहे. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केले. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे’, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
पाकिस्तान कुणालाही घाबरत नव्हता, पण तो फक्त बाळासाहेबांना घाबरायचा. एवढं मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व असतानाही नागरिकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बाळासाहेब लक्ष द्यायचे, त्यामुळेच गेली 25 वर्षे ठाण्याची सत्ता ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.