अहमदनगर,दि.२३ जानेवारी,(प्रतिनिधी) – समाजात प्रकाशमान होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा. ज्ञानाने सन्मान मिळतो. तर जीवनात शिस्त व संयमाने प्रगती साधता येते. शिक्षक हे जीवनातील मार्गदर्शक असतात, त्यांच्या सूचनांचे पालन केले गेले पाहिजे. स्वतःचे क्षेत्र स्वतःला निवडा व त्या क्षेत्रात स्वतःला झोकून आपले अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र म्याना, जितेंद्र वल्लाकटी, माजी अध्यक्ष दत्तात्रय रासकोंडा, माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण गोटीपामुल, दिपक रामदिन, माध्यमिकचे मुख्याध्यापक संदिप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडूरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, शिक्षक प्रतिनिधी भानुदास बेरड आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात माध्यमिकचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी श्रमिकांच्या मुलांना घडविण्याचे कार्य मार्कंडेय शाळा करीत आलेली आहे. कोरोना काळातही बिकट परिस्थितीवर मात करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय अविरत सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी वार्षिक अहवाल सादर करुन कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचा आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोष यादव यांनी करुन दिला. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या हस्तलिखीताचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर अतिशय खडतर परिस्थितीत सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका तडका या युवतीचा यावेळी सन्मान करण्यात आला.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, काळ बदलला असून, शिक्षणाबाबत पालक जागरूक झाले आहेत. गुणवत्ता वाढली, पण गुणवत्तेच्या टक्क्यावरुन एखाद्याचे भवितव्य ठरविता येत नाही. अनेकांच्या अंगी विविध कला-गुण दडलेले असतात, ते ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास जीवनात यश निश्चित आहे. शिक्षणाबरोबर आपल्यातील कलागुणांचा विकास करण्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देशभक्ती, धार्मिक गीतांसह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. प्रदुषण व सार्वजनिक स्वच्छते सारख्या सामाजिक विषयांवर जागृती केली. या विद्यार्थांच्या कला गुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका खरदास यांनी केले. आभार सरोजनी रच्चा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल विष्णू रंगा, शालेय शिक्षक प्रमोद चन्ना, नंदकुमार यन्नम, रावसाहेब इंगळे, प्रा. तानाजी काळुंगे, अर्चना साळुंके, जयश्री मेहेर, रेणुका खरदास, अनिता भाटिया, आशा दोमल, प्रा. उत्तम लांडगे, प्रा. शिवाजी विधाते, सुवर्णा गोंटला, रंजना गोसके, अनिल आचार्य, शिला फाटे, शिक्षकेतर प्रतिनिधी निलेश आनंदास, सुहास बोडके, अजय न्यालपेल्ली, मथुरा आढाव आदी आदींनी परिश्रम घेतले.