अहमदनगर,दि.२२ जानेवारी,(प्रतिनिधी) – ग्लॅमरच्या जगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे. सुंदर दिसण्याबरोबरच वागणे, बोलण्याच्या व्यक्तीमत्वावरुन सौंदर्य खुलत असते. बाह्य सौंदर्याबरोबरच अंतर्गत सौंदर्य व्यायाम, आहाराने खुलविण्याचा सल्ला कॉस्मेटोलॉजी तज्ञ डॉ. स्वाती समुद्र यांनी दिला. जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हर अॅण्ड इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात ब्रायडल टॅलेंट शो व सौंदर्य कला मार्गदर्शन कार्यशाळेने झाला.
यावेळी उपस्थित युवतींना मार्गदर्शन करताना डॉ. समुद्र बोलत होत्या. यावेळी शासनाचा राज्य युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, डॉ. संतोष गांगर्डे, राजेंद्र तागड, जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, पुणे येथील मेकअप आर्टिस्ट अश्विनी येडे, आहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके, उपाध्यक्ष केतन ढवण, सचिव सुवर्णा कैदके उपस्थित होत्या.
पुढे डॉ. समुद्र म्हणाल्या की, समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य खुलविण्यासाठी मेकअप आर्टिसला परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शहरातील युवतींना अहिल्या मेकओव्हर अॅण्ड इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लेझर क्लिनिकची सुविधा मिळणार आहे. मेकअप आर्टिस्टबरोबर कॉस्मेटोलॉजिस्टची संकल्पना समाजात रुढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, सध्या फॅशनचे युग असून मेकअप आर्टिस्टला चांगली मागणी आहे. युवतींना करिअरच्या दृष्टीकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. जिल्ह्यात आधुनिक पद्धतीचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण इन्स्टिट्यूट उपलब्ध झाल्याने हे प्रशिक्षण सहज घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सुवर्ण कैदके यांनी कावेरी कैदके यांनी परदेशात सौंदर्य कलचे प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात मुलींनी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणाने महिलांचे सक्षमीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेकअप आर्टिस्ट अश्विनी येडे यांनी अद्यावत मेकअपचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांचा टॅलेंट शो रंगला होता. यामध्ये श्रुती चितळकर, भावना पोहेकर, अक्षदा झरेकर, रागिणी शिंदे, साक्षी पवार, साक्षी बरकडे, श्रद्धा दुतारे, पूजा गावित्रे, कोल्हापूरच्या संगीता कदम, सुप्रिया साळुंखे, नेवासा सोनईच्या अरुणा बनकर, कर्जतच्या मनीषा पिटेकर, सोनाली पिटेकर, आळेफाटाच्या संगीता जठार, तिसगावच्या दिपाली अडसरे, शेवगावच्या मंगल मगर, श्रद्धा धनवट, गीताश्री व्यवहारे, अश्विनी गुणवंत, स्वाती शेळके, अंबिका विरकर, डोंगरगणच्या शुभांगी मते, अंजली गाडे, स्मिता कर्डिले, श्वेता कोतकर या युवतींनी रॅम्पवॉक करुन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार भावना पोहेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील महिला व युवती उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.