रायपुर, दि.२१ जानेवारी, – गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताला आजचा सामना सहज जिंकता आला. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विजयात हातभार लावला अन् भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडला भारताने पराभूत केले. घरच्या मैदानावरील मागील २४ मालिकांमधील भारताचा हा २२ वा मालिका विजय आहे. भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेट्स राखून पराभव केला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १०९ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताकडून रोहित शर्माने ५० चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी केली. तर शुभमन गिलने नाबाद धावांची खेळी करत भारताच्या विजयावर २१व्या षटकातच शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला १०८ धावात गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याला हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या.