बहुजन समाज पार्टीचे उपायुक्तांना निवेदन
अहमदनगर,दि.१३ डिसेंबर,(प्रतिनिधी) – महापालिका हद्दीतील जुने वडगाव गुप्ता रोडच्या परिसराला भिंगारदिवे नगर नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व महापौर कार्यालयात देण्यात आले. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, शहर प्रभारी संजय डहाणे, शहर सचिव राजीव गुजर, मयूर भिंगारदिवे, माजी विधानसभा अध्यक्ष मनोज उघाडे, शहर महासचिव नंदू भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जुना सर्व्हे नं. 229 ची जमीन ही पुना भिंगारदिवे यांच्या नावे सन 1930 पासून होती. त्यानंतर सटवा भिंगारदिवे त्यांची मुले तसेच भिंगारदिवे कुटुंबीयांच्या नावाने आहेत. 1930 पासून आजपर्यंत भिंगारदिवे कुटुंबीय या परिसरात राहत आहे. सदरील सर्व्हे नंबर हा भिंगारदिवे यांच्या मालकीचा होता. भिंगारदिवे यांच्या आठवण म्हणून या परिसराला त्यांचे नाव देण्याची मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जुने वडगाव गुप्ता रोडच्या परिसरातील लोकवस्तीला भिंगारदिवे नगर नामकरण करण्यासाठी महापालिकेच्या सभेत ठराव घेऊन सदर परिसराला नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.