Homeक्राईमव्हिडीओ व्हायरल धमकी प्रकरणात तरुणास अटक

व्हिडीओ व्हायरल धमकी प्रकरणात तरुणास अटक

पुणे,दि.१७ जानेवारी, – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी भरतपूर परिसरातील रायपूर, सुकेती या गावांतून एका 24 वर्षीय तरुणाला सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणीचा डीपी व्हॉट्स्अ‍ॅपला ठेवून सायबर ठगांनी मैत्रीचे आमिष दाखवून पुण्यातील दोन तरुणांना जाळ्यात ओढले होते. या ठगांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. आरोपींच्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या दत्तवाडी तरुणाने, तसेच पद्ममावती भागातील तरुणानेही आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने राजस्थानातील गुरुगोठिया गावात छापा टाकून आरोपींना अटक केली होती. त्या वेळी गुरुगोठिया गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेकही केली होती. दत्तवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात गुुरुगोठिया गावातील तरुण सेक्सटॉर्शनच्या धंद्यात सामील असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, पद्मावती भागातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. संबंधित तरुणाने सायबर ठगाच्या सेक्सटॉर्शनला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहकारनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, संजय गायकवाड, सागर सुतकर, निखिल राजवाडे, सागर कुंभार राजस्थानला पोहोचले. रायपूर सुकेती गावात पोलिसांनी सापळा लावला. आठ दिवस पोलिसांनी पाळत ठेवली. राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणात एका 24 वर्षीय तरुणाला अटक करून त्याला पुण्यात आणले. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रायपूर सुकेती गावातील अनेक जण सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यात सामील असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले.

राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात रायपूर सुकेती गाव आहे. या गावातील तरुण सेक्सटॉर्शनच्या धंद्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते . त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आरोपीला पकडण्याचे आदेश दिले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!