अहमदनगर,दि.१६ जानेवारी,(प्रतिनिधी) – दशकपूर्ती साजरी करताना व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशपातळीवरील नॅशनल फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटच्यावतीने व्यंकटेश मल्टीस्टेटला सर्वोत्कृष्ट संस्था 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिर्डी येथे झालेल्या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नॅशनल फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बन मल्टीस्टेटचे संचालक सुकेश झंवर, व्यंकटेश मल्टीस्टेटचे सहसंस्थापक कृष्णा मसुरे, व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देहेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास पांडे, ऑपरेशन हेड संदीप शितोळे आदी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना चेअरमन अभिनाथ शिंदे म्हणाले की, कोणताही पूर्वानुभव नसताना समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेवून दहा वर्षांपूर्वी व्यंकटेश मल्टीस्टेटची मुहूर्तमेढ रोवली. लोकांचा विश्वास प्राप्त करीत एका ध्येयाने प्रेरित होऊन संस्था चालवली. सामान्य शेतकरी ते देशातील बड्या उद्योजकापर्यंत आमची नाळ जोडली गेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी संस्थेने राबविलेल्या योजना यशस्वी झाल्या. अर्थ साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बँक तयार केली आहे. उद्योग क्रांती उपक्रमातून नव्या पिढीला उद्योग, व्यवसायाचा कानमंत्र दिला. या वाटचालीत तब्बल अडीच लाखांहून अधिक सभासद संस्थेशी जोडले गेले आहेत. याशिवाय संस्थेने 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा व्यवसाय करण्याची कामगिरी केली आहे. आर्थिक क्षेत्रात काम करताना शिस्त महत्वाची असते. व्यंकटेश मल्टीस्टेटने नेहमीच शिस्तबध्द कारभार केला. यात सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान आहे. सभासद, ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी शिदोरी आहे. त्यामुळे संस्थेचा देशपातळीवर झालेला गौरव हा संस्थेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा गौरव आहे, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या