मुंबई,दि.८ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची महाविजेता ठरला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अक्षयला १५ लाख ५५ हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. गेल्या ९९ दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केले. अगदी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप – प्रत्यारोप हेसगळंच आपण जवळून पाहिलं. या खेळात सहभागी झालेल्या १६ स्पर्धकांचा खेळ आपण पाहिला. पण विजेता कुणी एकच असतो, आणि अखेर १०० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळाला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. खेळाडूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा, घरातील वावर, टास्क जिंकण्याची जिद्द यामुळे ती कायम चर्चेत राहिली.
बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत हे सदस्य ‘टॉप ५’ मध्ये पोहोचले होते. त्यामुळे या पाच जणांमधून कोण महाविजेता किंवा महाविजेती होणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. अखेर अक्षय केळकर विजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज १६ स्पर्धक आणि १०० दिवसांचा प्रवास संपला आहे.
बिग बॉस मराठी’च्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजी तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंट ने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी… या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षिदार असतील.
बिग बॉस मराठीच्या घरातील एक मास्टर माइंड चेहरा म्हणजे अक्षय केळकर. अक्षय केळकर हा मालिका जगतात गाजलेला कलाकार. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली.