कर्जत,दि.२ जानेवारी,(प्रतिनिधी) – कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार गणेश जेवरे यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारणी निवडीसाठी बैठक पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी गणेश जेवरे, उपाध्यक्षपदी नीलेश दिवटे, सचिवपदी मोतीराम शिंदे व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून सुभाष माळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गणेश जेवरे म्हणाले की, कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मला मिळाल्याने पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आगामी काळात पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबीयांना शासनाचे विविध लाभ व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. नीलेश दिवटे म्हणाले कर्जत तालुका पत्रकार संघाच्या उपध्यक्षपदी काम करण्याच्या मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करीत सर्व जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या सूचनेनुसार चांगले काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले मित्र मंडळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप गदादे, नगरसेवक पती तथा जेष्ठ नेते रवी सुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे, युवा उद्योजक नीलेश तनपुरे, मल्ल विद्या संघाचे तालुका उपाध्यक्ष पै.सावन शेटे आदींसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा देत सत्कार केला. तसेच फोन करून आणि सोशल मीडियावर शुभेच्या वर्षाव करण्यात आला आहे.