दीनदयाळ परिवाराची आयुक्त व महापौरांकडे मागणी
अहमदनगर,दि.३० डिसेंबर,(प्रतिनिधी) – औरंगाबाद शहराच्या धर्तीवर नगर शहरातील जुन्या बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करून उड्डाणपुला पेक्षा अधिक उंची वाढवावी. या महत्वाच्या कामासाठी महानगरपालिकेने त्वरित निर्णय घ्यावा अथवा दीनदयाळ परिवारास नागरिकांच्या सहकार्यातून हे काम सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अश्या मागणीचे निवेदन दीनदयाळ परिवाराच्या वतीने निमंत्रक वसंत लोढा यांनी महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे व महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर शहरातील जुन्या बस स्थानक चौकात अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. नगरकरांसाठी महाराजांचा पुतळा शक्तीस्थळ असून महाराजांच्या पुतळ्याच्या नित्य दर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळत आहे. मात्र नगर शहराच्या विकासास चालना देणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या उभारणी नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा झाकोळून गेला आहे. नागरिकांना येता जाता महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन होत नाहीये. त्यामुळे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्वरित नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम हाती घेवून या पुतळ्याची उंची उड्डाणपुला पेक्षा अधिक वाढवावी. जेणेकरून उड्डाणपूला वरून व खालच्या रस्त्याने जाता येता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नागरिकांना व्यवस्थित दिसेल.
संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातीलही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुला मुळे झाकोळून गेला होता. मात्र नागरिकांनी मागणी केल्यावर तेथील महानगरपालिकेने लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरणाचे काम हाती घेवून पुतळ्या भवती आकर्षक सुशोभीकरण करून उंचीही वाढवली आहे. असेच काम नगरमध्येही महानगरपालिकेने त्वरित हाती घ्यावे. महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत संभाजीनगरच्या धर्तीवर या कामास मंजुरी द्यावे, अशी मागणी दीनदयाळ परिवाराच्या वतीने करण्यात आली.
यावेळी दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, सदस्य बाळासाहेब खताडे, नरेंद्र श्रोत्री, सुहास पाथरकर, मुकुंद वाळके, बापू ठाणगे, गौतम कराळे, शाकीर सय्यद, राहुल रासकर, बाळासाहेब काळे, हेमंत मुळे, उमेश साठे, केवळ लोढा, शंकर येमूल, अशोक कानडे, सोमनाथ चिंतामणी, गणेश शिंदे, बाबासाहेब साठे, अभिषेक शिंदे, नसीर शेख व नितीन शेलार उपस्थित होते.