अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. ऑप.बँक लि.या बँकेत विविध श्रेणीतील ७०० जागांसाठी सरळसेवा नोकरभरती करणेसाठी माहे सप्टेबर २०२३ मध्ये परवानगी दिलेली आहे. सदरहू पदे फक्त ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेऊन भरणेबाबत सुचना केलेल्या आहेत.
जिल्हा बँकेची सरळसेवा नोकरभरती परिक्षा घेण्यासाठी मा. सहकार आयुक्त यांनी सहा एजन्सीचे पॅनल माहे मार्च २०२४ मध्ये तयार केलेले आहे. त्यामध्ये आय.बी.पी.एस., टीसीएस, इंडीयन टेलीफोन इंडस्ट्रीज लि. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि., एम. के.सी.एल व वर्कवेल इन्फोटेक प्रा.लि. या एजन्सीचा समावेश आहे. या सहाही कंपन्यांशी बँकेने संपर्क करून ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेणेसाठी निविदा भरावी म्हणून कळविले होते. त्यानंतर आय.बी.पी.एस. या कंपनीने आम्ही कुठल्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होत नाही, असे बँकेस कळविले होते, तर टी.सी.एस. या कंपनीने त्यांची महाराष्ट्र शासनाने अशा परिक्षा घेणेसाठी पॅनलमध्ये निवड केलेली आहे, निविदा प्रक्रिया न राबविता नोकरभरती बाबत शासनाने तयार केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य करून, आमच्या कंपनीसोबत करार करुन, नोकरभरती प्रक्रिया राबवावी, असे बँकेस कळविले होते, तसेच आय. टी. आय.लि. मुंबई व ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. या एजन्सीशी बँकेने वारंवार संपर्क साधुन निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे कळविले होते. मात्र त्यांनी बँकेस निविदा सादर केलेल्या नाहीत.
निविदा प्रक्रियेमध्ये एम. के. सी.एल. व वर्कवेल इन्फोटेक प्रा.लि. या दोन संस्था सहभागी झाल्या होत्या, त्यानुसार त्यांच्या प्रतिनिधींशी निगोशिएशन करणेत आले व त्यानंतर वर्कवेल इन्फोटेक प्रा.लि. या संस्थेची ऑनलाईन परिक्षा घेणेसाठी बँकेने निवड केली. त्यानंतर या कंपनीला ऑनलाईन परिक्षा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घ्याव्यात म्हणून कळवुन त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यामधील १० केंद्रांची यादी देण्यात आली. त्यानुसार त्यांनी या केंद्रांशी संपर्क केला होता, परंतु या केंद्रामध्ये संगणकाची संख्या कमी आहे.
तसेच ऑनलाईन परिक्षा घेण्यासाठी ऑनलाईन युपीएस व जनरेटर बॅकअप असणारे व त्या सेंटरवर टेक्निकल सपोर्ट उपलब्ध असणारे केंद्र आवश्यक असते. अहिल्यानगर जिल्ह्यात अशा पायाभूत सुविधा उपलब्ध असणारे एकच केंद्र आहे व तेही पुढील सहा महिन्यांसाठी इतर परिक्षांसाठी बुक आहे, म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या परिक्षा घेता येणार नाही, असे वर्कवेल कंपनीने सांगितले आहे. तसेच अशाप्रकारच्या ऑनलाईन परिक्षा आय.बी.पी.एस. व टी.सी.एस. कंपनीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत घेतलेल्या नाहीत.
बँकेच्या या नोकरभरतीसाठी २८२८२ अर्ज आलेले आहेत, तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ऑनलाईन परिक्षा प्रथमच घेत आहे. क्लार्क, सुरक्षा रक्षक व वाहनचालक या पदासाठी एकाच उमेदवाराने अर्ज केलेले आहेत, त्यांची तिनही पदांसाठी परिक्षा घेता यावी व या परिक्षा लवकर व्हाव्यात म्हणून मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी क्षमता असल्यामुळे तांत्रिक सर्व पायाभूत सुविधा असणारे व तेथे टेक्निकल सपोर्ट उपलबद्ध असल्यामुळे पुणे शहरात या परिक्षा सहा दिवस घेतल्या जाणार आहेत, ही परिक्षा वाघोली, कोंढवा, बिबवेवाडी व लोणी काळभोर या परिसरातील केंद्रांवर घेतली जाणार आहे. अशाप्रकारे इतर काही जिल्हा सहकारी बँकांनी सर्व तांत्रिक सुविधायुक्त (इन्फ्रास्ट्रक्चर) केंद्रावर घेतलेल्या आहेत. या केंद्रावर आय.बी.पी.एस. व टी.सी. एस. कंपन्यांनी परिक्षा घेतल्या आहेत, ज्या पध्दतीने आय.बी.पी.एस., टी.सी.एस. ज्या पध्दतीने परिक्षा घेते, त्या पध्दतीने अत्यंत पारदर्शकपणे ही परिक्षा घेतली जाणार आहे. तरी नोकरभरती संदर्भातील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,
परिक्षा झाल्याबरोबर या परिक्षांची Answer Key प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर यावर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात येणार आहेत, त्या हरकती निकालात काढुन अंतिम Answer Key प्रसिध्द करून, त्यानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा माहे जानेवारी २०२५ मध्ये दिनांक ९,१०,११,१२,१३ व १९ तारखांना दररोज तीन सत्रात घेतली जाणार आहे. सदरहू परिक्षांची काठिण्य पातळी एकसारखी राहणार आहे. तसेच परिक्षेची काठिण्य पातळी आय, बी.पी.एस. व टी.सी.एस. या संस्था घेत असलेल्या परिक्षेच्या धर्तीवर आहेत. अशाप्रकारे संपूर्ण सरळसेवा नोकरभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जात आहे. अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जनरल मॅनेजर, पर्सोनेल यांनी दिली.