अहमदनगर (प्रतिनिधी) – सन २०१८-१९ चा उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार राज्याचे माजी महसूल मंत्री,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानमंडळाचे कांग्रेसचे नेते मा.आमदार बाळासाहेब थोरात यांना मिळाला. त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
मुंबई विधान भवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता त्याच ठिकाणी झालेल्या भव्य अशा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुमु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जयंत वाघ आणि सहकार्याने आनंद व्यक्त करत संगमनेर येथे डॉक्टर जयश्री थोरात यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या इंदिरा महोत्सव या सोहळ्यात व्यासपीठावर त्यांचा विशेष गौरव केला. यावेळी घनश्याम शेलार, संपतराव मस्के आदी त्यांच्यासमवेत होते.
संगमनेर येथे डॉक्टर जयश्री थोरात यांचा महिलांच्या सन्मानार्थ इंदिरा महोत्सव पार पडला या महोत्सवाला जयंत वाघ आणि सहकाऱ्यांनी हजेरी लावली. काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.थोरात यांचा हा सन्मान असल्याचे वाघ यांनी म्हटले.
1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने थोरात यांनी विजय मिळवला. सहकार चळवळीतील महाराष्ट्राचा आदर्श, महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व म्हणून थोरात यांचा दबदबा आहे, विधानसभा संसदीय मंडळात त्यांनी आतापर्यंत महसूल, मृदसंधारण, पशु,वित्त, कृषी, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, दुग्ध व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, माहिती जनसंपर्क तंत्रज्ञान अशी विविध त्यांची जबाबदारी कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वीपणे सांभाळली. देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, आणि संगमनेरचे भाग्यविधाते कै.भाऊसाहेब थोरात यांचा राजकीय वारसा जपत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पासून केंद्रीय वर्किंग कमिटी सदस्य पदाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळली. एकनिष्ठ कार्य करणारा नेता म्हणून त्यांचे पक्षामध्ये नेहमीच कौतुक आणि गौरव होतो.
विधानसभा संसदेच्या विविध समित्यांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट आहे. राज्यातील शिक्षण सहकार क्रीडा सांस्कृतिक सामाजिक तसेच महिला सबलीकरण या विषयांमध्ये त्यांचं नेहमीच सर्वांना मोलाचं मार्गदर्शन असतं. कांग्रेसपक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी व महाराष्टाचे नेतृत्व द्यावे आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्य शैलीचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली.